जिजाऊंचे संस्कार | Jijaunche Sanskar Marathi Katha | Marathi Story

जिजाऊंचे संस्कार | Jijaunche Sanskar Marathi Katha

शहाजीराजे हे अतिशय पराक्रमी आणि शूर योद्धे होते. मोगली सैन्याची व त्यांची समोरासमोर भेट झाली. शहाजीराजे निकराने लढत होते परंतु शत्रू जास्त बलवान होता. आदिलशाही सैन्यापुढे त्यांचे सामर्थ्य कमी पडले आणि शेवटी पाच वर्षे सांभाळलेली निजामशाही शहाजीराजांना सोडावी लागली. शेवटी राजे माहुलीच्या किल्ल्यात आले.

शहाजीराजे आता शत्रूच्या वेढयात अडकले त्यामुळे त्यांनी मनाविरूद्ध आदिलशाहीची सरदारकी स्वीकारली व ते आदिलशाहीचे सरदार झाले. या गोष्टीमुळे मोगल बादशहा घाबरला व त्यामुळे त्याने आदिलशहाला सांगितले की, शहाजीराजांना कर्नाटक प्रांती पाठवावे. बादशहाचे मर्जी राखण्यासाठी आदिलशहाने शहाजीराजांना विजापुरला पाठविले. शहाजीराजे तेथे जाण्यापूर्वी जिजाऊंना भेटण्यासाठी गेले.

शिवबा सहा वर्षाचे झाले होते. जिजाऊ आणि शिवबा यांनी पुण्यास राहावे असे ठरले. पुण्याला जाण्याची त्यांची चोख व्यवस्था केली गेली. पुण्याला जात असताना डोंगर खोऱ्यांची वाट होती. पुण्यात पोहोचल्यावर सर्वत्र पडक्या घरांचे ढिगारे, भग्न वाडे आणि हवेल्या हे सर्व पाहून जिजाऊंना खूप वाईट वाटले आणि पुण्यात कशी बशी जीवन जगणारी काही कुटुंबे बघून त्यांना सुलतानशाहीचा खूपच राग आला.

जिजाऊसाहेब आपल्या पुत्राला घेऊन पुण्यात राहायला आले आहेत हे कळल्यावर सर्व लोकांनी माँसाहेबांना मुजरा करून त्यांचे स्वागत केले. सर्वजण त्यांना माँसाहेब म्हणू लागले. माँसाहेबांनी लोकांना धीर दिला व त्या म्हणाल्या, “आम्ही पुण्यात आलो आहोत, ते दुष्टांनी केलेल्या राखरांगोळीतून नवीन व सुरक्षित पुणे उभारण्यासाठी.”

ते ऐकून लोकांना फारच आनंद झाला. जिजाऊसाहेब व शिवबा यांच्यासाठी पुण्यात एक मोठा वाडा बांधण्याचे ठरविले. कसब्याच्या टोकाला, जवळच नदी असलेल्या ठिकाणी लवकरच एक भव्य वाडा बांधण्यात आला. त्या वाडयाचे नांव लाल महाल असे ठेवण्यात आले. तो वाडा घोडयाची पागा, धान्यकोठी, कचेरी, देवघर अशा सर्व सोयींनीयुक्त असा भव्य होता. एक चांगली शुभ वेळ बघून जिजाऊ आणि शिवबा त्या वाडयात राहण्यास आले.

माँसाहेब या धार्मिक वृत्तीच्या असल्यामुळे त्यांनी पडक्या देवळांचा जीर्णोद्धार करण्यास सांगितले. देवळांना डागडुजी आणि नवीन देवळांचे बांधकाम वेगाने सुरू झाले. एका देवालयात माँसाहेबांनी स्वतःच समारंभपूर्वक श्री गजाननाची प्राणप्रतिष्ठा केली आणि हेच पुण्याचे आराध्यदैवत कसबा गणपती म्हणून प्रसिद्धीस आले. जिजाऊसाहेब व शिवबा रोज तेथे दर्शनाला जात असत. शिवबा माँसाहेबांना अनेक प्रश्न विचाररून त्याविषयी माहिती मिळवत असत. माँसाहेबांकडून मोगल, निजाम यांच्या दुष्कृत्यांचा इतिहास ऐकून बाल शिवाच्या मुठी अतिशय रागाने व संतापाने आवळल्या जात.

माँसाहेब शिवबाला सांगत, “शिवबा, ही भूमी आपली, हा देश आपला; परंतु ते सुलतान व बादशहा बळजबरीने आपल्या लोकांवर राज्य करतात, आपल्या लोकांवर जुलूम-अत्याचार करतात, आपल्या लोकांच्या घरा-दारांची जाळून-पोळून राखरांगोळी करतात, शेतातली उभी पिके घोडयाच्या टापांखाली चिरडतात, ते आपल्या लोकांना गुलामासारखे वागवतात. हे सर्व अत्याचार बघून अत्यंत वाईट वाटते.” माँसाहेबांचे हे बोलणे ऐकून शिवबा फार बैचेन होत असे.

माँसाहेब व शिवबा पुण्यात आल्यापासून पुणे सोडून गेलेले लोक पुन्हा पुण्यात राहू लागले होते. त्यांना त्या दोघाचां खूप आधार वाटत असे. पुण्यातील प्रजेला आता कसलीही भीती वाटत नव्हती, त्यामुळे पुण्याची वस्ती परत वाढू लागली होती.

या लाल महालात शिवबांच्या शिक्षणाची देखील चांगली व्यवस्था केली होती. मुळाक्षरे गिरवणे, लिहायला-वाचायला शिकणे, हत्यारांची माहिती करून घेणे, दांडपट्टा चालविणे, घोडेस्वारी करणे, तलवारीचे हात करणे, तिरंदाजी, कुस्ती, भालाफेक या गोष्टी शिकत होते. याच बरोबर ते संस्कृत, फारसी या भाषांचे ज्ञान, कचेरीचे कामकाज याची देखील माहिती करून घेत होते.

माँसाहेबांचे त्यांच्या जहागिरीच्या कारभाराकडे पूर्ण लक्ष होते. पुण्यातील लोकांचे जीव आणि वित्त सुरक्षित राहील, याची अतिशय उत्तम व्यवस्था त्यांनी केली होती. शेतकऱ्यांना रानटी जनावरांचा खूप त्रास होत असे. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांचीच गस्ती-पथके उभारली. त्यामुळे रानटी जनावरांचा त्रास कमी झाला व चोर-दरोडेखोर यापासून देखील प्रजेचे रक्षण झाले. शेतकरी सुखी झाले. जहागिरीच्या खजिन्यात भर पडून पुण्यातील व्यापार-उदीम वाढीस लागला. जणू पुण्याचा कायापालटच झाला.

जिजाऊंच्या मनात प्रजेविषयी अतिशय करूणा व दयाभाव होता. त्यामुळे शिवबांना देखील अनेक गोष्टी समजल्या होत्या. शिवबा आपल्या सवंगडयाबरोबर डोगर-दऱ्या हिंडून बघत व कपारी, भुयारे यांची माहिती घेत असत. सर्व प्रजेशी ते जवळीक साधून त्यांना आपलेसे करत व त्यांचे सुख-दुःख जाणून घेत असत.

दऱ्याखोऱ्यात फिरताना शिवबांना मावळयांची मुले भेटत असे. पुढे हेच मावळे शिवाच्या जिवाभावाचे सोबती, सवंगडी बनले. शिवबा त्यांना पुण्यातील वाडयात घेऊन येत असत. माँसाहेब देखील त्यांच्याशी प्रेमाने व आपुलकीने वागत असे.

शिवबा आता मोठे झाले तेव्हा ते माँसाहेबांच्या कडक शिस्तीत प्रत्येक गोष्ट शिकत होते. ते सर्वगुणसंपन्न होत होते. राजाला आवश्यक असणारे सगळे गुण त्यांच्यात होते. माँसाहेबांनी त्यांच्यावर सुसंस्कार केले होते. त्याच्या अंगी बाणेदारपणा, शौर्य, प्रजेबद्दल प्रेम, अन्यायाविरूध्द चीड असे गुण दिसून येत होते. जुलमी, धर्मांध, परकी सुलतानांच्या गुलामगिरीतून आपली भूमी मुक्त करण्याचे विचार त्यांच्या मनात मूळ धरू लागले होते. स्वधर्माचा अभिमान, प्रजेविषयी कळवळा, थोरा-मोठयांचा आदर करणे हे गुण त्यांच्या ठायी दिसून येत होते.

शिवबांचे ते गुण पाहून माँसाहेबांचा ऊर अतिशय अभिमानाने भरून येत असे. त्यांच्या सर्व आशा-आकांक्षा शिवबाभोवती केंद्रित झाल्या होत्या. त्या नेहमी शिवबाला सांगत, “शिवबा तुला राम-कृष्णाप्रमाणे कार्य करायचे आहे. दुष्टांचे निर्दालन, पापी जनांचा नाश करून स्वधर्माचे, प्रजेचे रक्षण करायचे आहे आणि असे केलेस तर माझे समाधान होईल. परक्या बादशहाचा चाकर होण्यात धन्यता मानू नकोस. तुझे वडील फक्त नाईलाजाने परक्यांसाठी लढत आहेत. स्वतंत्र राज्य स्थापन करून तुझ्या वडिलांनी देखील दौलत सांभाळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यात त्यांना यश आले नाही परंतु तू आपल्या मात्या-पित्याची ही इच्छा पूर्ण कर. वडिलांनी मिळविलेल्या जहागिरीवर जगण्यात पुरूषार्थ नाही तर काही नवे निर्माण करण्यासाठी तुझा जन्म झाला आहे हे तू लक्षात ठेव. स्वराज्य स्थापून तू ‘श्री’ च्या राज्याची स्थापना कर. हीच त्या जगदंबेची, शंभू-महादेवाची इच्छा आहे, हे जाणून घे.”

माँसाहेबांच्या या विचारांनी व शिकवणीने शिवबांचे मन महत्त्वाकांक्षेने स्वाभिमानाने भरून येत होते आणि स्वराज्य-स्थापनेची इच्छा प्रबळ होत होती.

Leave a Comment

x