आजकालची तरुण पिढी ही प्रेम आणि आकर्षण (शारीरिक) यांतील फरक ओळखु शकते का?

“कधीची पीढी प्रेम आणि शारीरिक आकर्षण यातील फरक ओळखु शकत होती?”

म्हणजे अशी एखादी रेष आपल्याला दिसतेय का की १९६२ सालापर्यंतच्या तरूण पिढीला यातील फरक ओळखू येत असे, १९७० सालानंतर मात्र हे प्रमाण सम्पुष्टात आलं!

पूर्वीच्या पिढीतील माणसांना भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण वाटलच नसेल का?

थेट तुलना अयोग्य आहे दोन्ही संकल्पनांची मला जाणीव आहे पण एक उदाहरण देतो पुढे त्यामागील मतितार्थ समजून घ्या.

हे शारिरीक आकर्षणाबद्दल चर्चा करणार्‍यांची परीस्थिती मला भ्रष्टाचाराबद्दल चर्चा करणार्‍या लोकांसारखीच वाटते.

म्हणजे मी अनेक जण बघितलेत जे भ्रष्टाचाराबद्दल फार तावातावाने बोलतात, ते कसं अन्याय्य आहे हे ठासून सांगतात, पण जेव्हा त्यान्ना स्वत:ला आडमार्गाने फायदे मिळतात तेव्हा ते अजिबात सोडत नाहीत. हे असं का? म्हणजे आपण प्रमाणिक असतो कारण आपल्याला अप्रामाणिकपणे वागायची संधी मिळालेली नसते. मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला त्यामुळे बागायतीचं नुकसान झालं म्हणून सरकारने मदतनिधी, नुकसानभरपाई जाहीर केली. त्यावेळी गावाबाहेर असलेले, बागायतीतला एक तणही उचलायला कधीही न फिरकलेले, बाहेर नोकरीधंदा करून नियमीत पगार घेणारे अनेक जण गावाकडे ग्रामपंचायतीत धावले होते तो निधी मिळवायला. कारण बागयती क्षेत्रावर कागदोपत्री पिढीजात त्यांचं नाव लागलेलं होतं. शासकीयदृष्ट्या ते लाभार्थी होते. पण वास्तवात त्यान्नी जर का त्या बागेत स्वत: मेहनत केली नसेल, पैसे गुंतवलेच नसतील तर तो फुकट मिळालेला पैसा घेणे हा देखिल भ्रष्टाचार नाही का? पण त्यांच्या दृष्टीने तो भ्रष्टाचार नव्हता. जेव्हा एखादा सरकारी कार्यालयातला माणूस पैसे खातो, किंवा पैसे घेवून काम करतो तोच भ्रष्टाचार ही अत्यंत सोयीची व्याख्या आपल्या दृष्टीने असते.

कॉलेजमधल्या अनेक मुला-मुलीन्मध्ये देखील हीच गम्मत बघायला मिळाली. पहिल्या वर्षाला असताना यांचा फार विरोध असतो सिनियोरिटी गाजवणार्‍यांवर. दुसर्‍या वर्षाला पाऊल टाकताच यान्ना अचानक कुठून साक्षात्कार होतो देव जाणे पण तिसर्‍या वर्षातले लोक यांचं मन वळवतात की आपल्या कॉलेजच्या / होस्टेलच्या परंपरा आहेत. एक शिस्त नवीन आलेल्या मुलान्ना लावायला हे जरूरी आहे. ते नाही केलं तर ही पहिल्या वर्षाची मुलं आपल्या समोरपण दादागिरी करतील आणि मग पूर्ण कॅम्पसमधली शिस्त बिघडेल. आपला काही मान रहाणार नाही. म्हणजे ज्या गोष्टी सहा महिन्यांपुर्वी यान्ना चुकीच्या वाटत होत्या त्या आता पटायला लागतात. आणि अधीक सहा महिन्यान्नी जेव्हा तेच तिसर्‍या वर्षात पाऊल टाकणार असतात तेव्हा दुसर्‍या वर्षात पाऊल टाकणार्‍यान्ना हे स्वत: गुरू बनून हाच कानमंत्र पुढे सरकवतात. थोडक्यात, जेव्हा आपल्याला ते करायची संधी मिळत नाही तेव्हा आपण सगळे गरीब बिचारे असतो.

मला वाटतं हाच नियम इथेही लावता येईल. पूर्वीच्या पिढ्यान्ना शरिरीक आकर्षण वाटत असेलही, ते प्रेम आहे का नाही इथपर्‍यंत शंका असतीलही. पण मुळात ते तपासण्याची, त्यासंदर्भात समोरील मुलाला / मुलीला भेटून त्यांच्याशी प्रेम जुळण्याची शक्यताच किती होती? तशी सामाजिक व्यवस्थाच कितपत होती? तशा संधीच कितपत होत्या? तरीही तशा प्रतिकूल परिस्थितीतही अनेक प्रेमप्रकरणांच्या कथा आपण जुन्या पुस्तकान्मधून (दिवाळी अंक, कथा, कादम्बर्‍या. – नाथा कामतला कसं विसरता?), चित्रपटान्मधून आपण बघितल्याच आहेत. अखेर जे समाजात घडतं तेच तत्कालीन साहित्यातही प्रतिबिम्बीत होतं. चित्रपटसृष्टीतल्या, क्रिकेट मधल्या, राजकारणातल्या थोडक्यात ज्यान्ना मोठं वलय आहे आणि ज्यांना आसपासचा ‘समाज काय म्हणेल?‘ अशा प्रश्नांनी फरक पडत नाही अशा लोकांच्या प्रेमकथा आपण अगदी ५० वर्षांपूर्वीच्या काळातल्याही बघतो. मग त्या काळातले इतर सर्वसामान्य मुलं / मुली तसं करत नव्हते  कारण उघड आहे की बिचार्‍यान्ना संधीच नव्हती. ज्यान्ना होती त्यान्नी केलच की प्रेम.

आता ते प्रेमच आहे का निव्वळ शारिरीक आकर्षण हे ओळखायचा काही फोर्म्युला नाही. ते ज्याचं तो सांगेल. भले त्याला / तिला तेव्हा नसेल कळत. पण जेव्हा धक्का बसेल आणि ते शुद्धिवर येतील तेव्हा नक्की कळेल.

तसही आपलं ते प्रेम, दुसर्‍याचं ते आकर्षण असं मानायची मोठीच परंपरा आहे आपल्याकडे. मग ते कुठल्याही काळातले, कुठल्याही पिढीतले असोत. तुम्ही मागच्या पिढीशी तुलना का करताय? मी सध्याच्याच अनेक मुलामुलीन्ना छातीठोकपणे खरं प्रेम या विषयावर हक्काने तत्वज्ञान सांगताना ऐकलय, आणि काही काळाने त्यांचंही ब्रेकअ‍प झालेलं बघीतलय. मग एवढी विचारांची बैठक पक्की असताना, एवढे समंजस विचार असताना त्यान्नी जर का एका व्यक्तीची निवड केली मग ते परीपूर्ण प्रेमच असायला हवं नाही का? आपल्याच समवयस्क केवळ लूक्सवर भाळून प्रेमात पडलेल्यान्ना नावं ठेवताना, त्यांचं प्रेम ‘आकर्षण’ म्हणून दुय्यम  मानताना या ‘स्पष्ट विचारांच्या’ लोकांचही कधी ब्रेकअ‍प झालं त्यान्नाही कळलं नाही.

मग अशा ब्रेक अ‍प झालेल्या विचारी लोकांचं ‘खरं प्रेम’ मानायचं का?

केवळ बाह्य रूपावर भाळून प्रेमात पडलेले मात्र तरीही एकत्र राहिलेले, पुढे कदाचीत लग्नात अडकलेले आज ‘शारिरीक आकर्षणाचे’ बळी मानून आनंदी नसतीलच असं गृहीत धरायचं का?

हो असेल तर कशाच्या आधारावर?

नाही असेल तर कशाच्या आधारावर?

आपण कोण ठरवणारे?

सद्ध्या ह्या गोष्टी फार जाणवतायत कारण एकूणच समाज फार मोकळा झालाय, शिक्षणानिमित्त, नोकरी निमित्त समाज एकमेकात पुन: मिसळतोय. सोशल मीडीया, चित्रपट, जाहिरातबाजी यासगळ्यांचा आपल्या रोजच्या जिवनावर, आपण काय विचार करतोय, काय खातोय, काय परिधान करतोय, घरात कोणत्या वस्तू वापरतोय इथपर्यंत सगळ्यावरच खुप खोल परिणाम झालाय आणि होतोय आपल्याही नकळत. त्यात पुन्हा नवनवीन अ‍ॅप्स मुळे, सोशल मीडीया साईट्स मुळे मुलामुलींचे आपापसातील संवाद वाढलेत. विशेषत: चॅट मुळे पूर्वीप्रमाणे एकांतात गप्पा करायला दोघान्ना भेटून बाजुला बसायची गरज उरली नाही. त्यामुळे अर्थातच सर्वच स्तरातला संवाद वाढला. त्यामुळे साहाजिकच दोन माणसं जवळ येण्याच्या शक्यता वाढल्या. त्यामुळेच खरं प्रेम / खोटं प्रेम / फसवं प्रेम / शारिरीक आकर्षण या अशा शक्यता दिसून येण्याचही प्रमाण वाढलं.

आकर्षणाचं काय? तो तर मानवी स्वभाव आहे. निसर्गदत्त आदीम प्रवृत्ती आहे.  माणसांच्या समाज रचनेतून एका शिस्तीत बांधलेली कुटुम्बव्यवस्था जरी आपण मान्य केली तरीही कुटुम्ब ही संकल्पनाच मानव निर्मित आहे, कृत्रीम आहे. निसर्गाच्या भावना त्या पलिकडच्या असतात, त्या शिस्तीत अडकवता येतील पण निर्माण होण्याचं थाम्बवू शकत नाही. हे अपरीहार्य आहे.

सध्या जे चाललय ते योग्य आहे का अयोग्य हा स्वतंत्र चर्चेचा विषय आहे. त्याबद्दल नंतर वेगळ्या प्रश्नात सविस्तर बोलू. तूर्तास खरं प्रेम आणि आकर्षण यातला फरक आजकालच्या पिढीला ओळखता येईल का याबद्दल एवढच म्हणता येईल की  ज्यांचं सर्व काही सुरळीत सुरू आहे ‘त्यांच्यासाठी’ ते ‘खरं प्रेम’ आहे. जर त्यांचं मध्येच तुटलं तर त्यांच्याचसाठी ते आधीचं ‘खरं प्रेम’ : आकर्षण होईल.

आपण एक त्रयस्थ म्हणून कशाच्या आधारावर निर्णय देणार?

मग तो सध्याच्या पिढीतला असो किंवा मागच्या पिढीतला किंवा येणार्‍या पिढीतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *