पालथ्या घडयावर पाणी | Marathi Katha | Marathi Story

हिताचा उपदेश
एका गावात एक नरूभाऊ नेभळे नावाचे गृहस्थ राहात होते. ते कोणत्याही कामासाठी घराबाहेर जायचे असेल तर त्याआधी त्यांच्या बायकोला साष्टांग नमस्कार करत आणि मगच घराबाहेर जात असत. ते एकदा त्यांच्या शेजाऱ्याच्या लक्षात आले व तो त्यांना म्हणाला, “हे काय नरूभाऊ, प्रत्येक पतीनं आपल्या पत्नीस सन्मानाने वागवावं हे बरोबर आहे, परंतु प्रत्येक वेळी कामासाठी बाहेर जाताना तिला साष्टांग नमस्कार घालणं ही गोष्ट मात्र पटण्यासारखी नाही.”

तेव्हा नरूभाऊ त्याला म्हणाले, “अहो, ते कसे आहे, की ती माझ्यापेक्षा शक्ती व बुद्धिने श्रेष्ठ आहे त्यामुळे मी तिलाच साष्टांग नमस्कार घालणार मग दुसरे कोणाला घालणार! तुम्हाला का?”
शेजारी नरूभाऊंना म्हणाला, “हे बघा नरूभाऊ माझ सांगणं इतकचं आहे की, तुमची पत्नी ज्याला नमस्कार करते तो देव तिच्यापेक्षा श्रेष्ठ आहे व त्यामुळे तुम्ही इथूनपुढे त्या देवाला साष्टांग नमस्कार करीत जा.”

नरूभाऊंना शेजाऱ्याचे ते म्हणणे पटले व ते बायकोऐवजी देवाला नमस्कार करून बाहेर जाऊ लागले. परंतु नरूभाऊंचे ते नमस्कार फक्त दोन-चार दिवसच देवाच्या नशिबाला आले, कारण एकदा रात्री नरूभाऊंना जाग आली तेव्हा एक उंदीर देव्हाऱ्यातील देवांच्या अंगावरून फिरत असताना त्यांना दिसला आणि त्यामुळे नरूभाऊंना वाटले की, हा उंदीर खरोखरच देवापेक्षा जास्त श्रेष्ठ आहे कारण तो एवढा फिरत असताना देखील देव ते निमूटपणे सहन करत आहेत म्हणून तेव्हापासून ते देवाला सोडून रोज त्या उंदराला नमस्कार करू लागले.

उंदराच्या उपासनेत असेच सात-आठ दिवस गेल्यानंतर एके दिवशी दुपारी एका बोक्याने त्या उंदराला झडप घालून खाऊन टाकले व ते पाहून बोका जास्त श्रेष्ठ आहे असे समजून नरूभाऊ आता रोज त्या बोक्याला नमस्कार करू लागले.

एकदा तो बोका दुधाच्या पातेल्यात डोळे मिळून दूध पीत असताना हळूच पाठीमागून नरूभाऊंची पत्नी आली व तिने आपल्या हातातील काठी त्या बोक्याच्या डोक्यावर जोराने मारली त्यामुळे तो बोका कैलासवासी झाला. हा सर्व प्रकार बघितल्यावर नरूभाऊंना वाटले की, खरंच आपली बायकोच सर्वात जास्त श्रेष्ठ आहे म्हणून ते परत शेजाऱ्याकडे गेले व त्याला म्हणाले, “हे बघा, तुमच्या सांगण्याप्रमाणे मी देवापुढे साष्टांग नमस्कार घालू लागलो होतो, पण देवापेक्षा उंदीर, उंदरापेक्षा बोका आणि बोक्यापेक्षा माझी बायकोच श्रेष्ठ व शक्तीशाली असल्याचे मला दिसून आले व त्यामुळे यापुढे मी कामासाठी बाहेर जाताना तिच्यापुढेच साष्टांग नमस्कार घालणार आहे.”

शेजाऱ्याने नरूभाऊंचे ते बोलणे ऐकले आणि तो त्यांना म्हणाला, “हे पहा नरूभाऊ, मी तुमच्या हितासाठी किती जरी तुम्हाला उपदेश केला तरी ते ‘पालथ्या घडयावर पाणी’ हे मला माहितच होते.”

एखाद्याला कितीही चांगले सांगितले तरी तो त्याच्या बुद्धिप्रमाणेच वागत असतो.

Leave a Comment