प्रयत्नांती परमेश्वर | Prayatnanti Parmeshwar Marathi Katha | Marathi Story

हुशार साधू | प्रयत्नांती परमेश्वर | Prayatnanti Parmeshwar Marathi Katha

एका गावात एक मोहनलाल नावाचा तरूण रहात होता.

मोहनलालची जीव ओतून अध्ययन करण्याची व ज्ञानप्राप्तीसाठी कष्ट घेण्याची अजिबात तयारी नव्हती, परंतु तरीही त्याला लोकांकडून ज्ञानी म्हणवून घेण्याची व उगीचच मान मिळवून घेण्याची अपेक्षा मात्र होती. त्यासाठी मोहनलाल एकदा गंगेच्या किनाऱ्यावर गेला आणि आपल्या आवडत्या देवाच्या नावाचा जप करीत बसला.

मोहनलाल जप करीत असताना तेथून एक स्वतंत्र विचाराचा व स्पष्टवक्त्या स्वभावाचा साधू चालला होता. साधूने जेव्हा त्याला पाहिले तेव्हा तो मनात म्हणाला, “हा तरूण खरोखर मनापासून देवाचा जप करीत नसून, देवाला आवळा देऊन, त्याच्याकडून ‘कोहोळा’ काढण्याचा याचा विचार असावा, असे त्याच्यावरून दिसत आहे.

परंतु नुसता अंदाज करण्यापेक्षा आपण त्याला प्रत्यक्ष विचारूनच घ्यावे.” असा विचार करून तो साधू मोहनलाल जवळ गेला व त्याने त्याला विचारले, “का रे बाबा? देवाचा जप करण्यासाठी गंगेच्या किनाऱ्यावर येण्याचे कारण काय?”

मोहनलाल साधूला म्हणाला, “आता मी पवित्र अशा गंगेच्या काठी बसलो आहे, तेव्हा खोटं न सांगता येथे जप करण्यामागे माझा जो काही खरा हेतू आहे तो मी तुम्हाला सांगून टाकतो. तसे बघितले तर मला अभ्यासात कधीही गोडी वाटली नाही, किंवा ज्ञानी होण्यासाठी जे मोठ-मोठया ग्रंथाचे वाचन करावे लागते ते देखील मी कधी केले नाही. त्यासाठी डोक्याला उगीचच त्रास देणे मला कधी आवडले नाही. परंतु असे असले तरी लोकांनी मला ‘ज्ञानी’ म्हणून ओळखावे आणि मान द्यावा असे मला फार वाटते, म्हणून माझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी अतिशय सोपा मार्ग म्हणून मी काशीक्षेत्रातील गंगाकिनारी भोळया सांबाचा जप सुरू केला आहे व तो प्रसन्न झाला की मग मी त्याच्याकडून अशा प्रकारचा वर मागून घेणार आहे.”

मोहनलालचे ते बोलणे ऐकून साधू फक्त ‘अस आहे एकंदरीत’ असे म्हणाला व त्यापासून थोडया अंतवरावर गेला व गंगेच्या वाळवंटातील मूठ मूठ रेती तिच्या प्रवाहात टाकू लागला. पंचवीस-एक वेळा गंगेत रेती टाकून देखील त्या साधूचा हा विचित्र धार्मिक विधी चालूच होता, म्हणून थोडया वेळ जप बंद करून मोहनलालने त्याला विचारले, “साधूमहाराज हे काय? तुमचे केव्हा पासून काय चालले आहे? गंगेला रेतीचे अर्घ्य अर्पण करून पुण्यप्राप्ती होते, हे तुम्हाला कोणत्या दीडशहाण्या गुरूने सांगितले आहे?”

तेव्हा साधू म्हणाला, “हे तरूणा, मी गंगेला रेतीचे अर्घ्य अर्पण करीत नसून, यात्रेकरूंना गंगेच्या पैलतीरावर जाण्यासाठी नावाडयाला पैसे द्यावे लागू नयेत, म्हणून गंगेवर रेतीचा पूल उभारीत आहे.”

साधूचे ते बोलणे ऐकून मोहनलाल हसत हसत म्हणाला, “साधुमहाराज, नुसती रेती टाकून तुम्ही पूल कसा उभा करणार? अहो, त्यासाठी खास तंत्रज्ञानाची, सिंमेट, रेती, लोखंड इत्यादी साहित्याची आणि तसेच अनेक मजुरांच्या श्रमाची गरज असते, तेव्हा तो पूल उभा राहू शकतो.”

साधू लगेच मोहनलालला म्हणाला, “होय ना? हे जसे तुला कळते आहे, तसेच फक्त देवाच्या नावाचा जप ज्ञानी व वंदनीय होण्याच्या कामास येणार नाही हे तुला का कळत नाही. अरे, त्यासाठी खूप परिश्रम घेऊन, बरेच ज्ञान संपादन करावे लागते, जास्तीत जास्त कष्ट त्यासाठी घ्यावे लागतात आणि त्याचबरोबर लोकांना सन्मार्गाला लावण्याची आपल्या अंगी तशी पात्रता देखील असावी लागते आणि म्हणूनच ‘प्रयत्नांती परमेश्वर’ असे म्हंटले आहे.

1 thought on “प्रयत्नांती परमेश्वर | Prayatnanti Parmeshwar Marathi Katha | Marathi Story”

Leave a Comment