शहाजीराजांची सुटका | Shahaji Rajanchi Sutka Marathi Katha | Marathi Story

शहाजीराजांची सुटका | Shahaji Rajanchi Sutka Marathi Katha

शहाजीराजांना आदिलशहाने कपटाने कैदेत टाकले होते. फर्रादखान व त्याचे सहकारी सरदार बंगळूरला शहाजीराजांच्या कुटुंबियांना पकडून आणण्यासाठी गेले होते म्हणून आदिलशहा त्यांची वाटच बघत होता परंतु इतक्यात फर्रादखान व इतर सरदार माना खाली घालून आदिलशहापुढे उभे राहिले.

तेव्हा आदिलशहाला समजले की, बंगळूरला संभाजीराजांनी त्यांना बेदम मारून पिटाळून लावले होते. ते ऐकून आदिलशहा खूप संतापला. तो आता शिवरायांवर चालून गेलेल्या फत्तेखानाची वाट बघत होता. तेवढयात फत्तेखान अतिशय पडलेला चेहरा घेऊन आपल्या इतर सरदारांसह आदिलशहासमोर येऊन उभा राहिला. त्यांनी देखील शिवरायांनी आपल्याला कसे बेदम मारले ते सांगितले. त्याचबरोबर मुसेखान मेला, या सर्व बातम्या ऐकून आदिलशहा खूपच संतापला. आता त्याला कळाले होते की, त्याचा पराभव झाला होता.

आदिलशहाने तरीदेखील असा विचार केला की, काही झाले तरी अजून त्या शिवरायांचे पिताश्री तर आपल्या ताब्यात आहेत ना! असा विचार करून त्याने शिवरायांना पत्र पाठवीत त्यात म्हंटले, “तुम्ही तुमचे गड-किल्ले आणि जहागिरी आमच्या ताब्यात देऊन आमच्या दरबारात हजर व्हा; नाहीतर उद्या तुमच्या वडिलांचे आम्ही काही बरे-वाईट करू.” हे पत्र दिल्यामुळे आदिलशहाला वाटले की, आता शिवराय आपल्याकडे लगेच येतील.

परंतु तसे मात्र झाले नाही. कारण शिवराय विचार करीत होते की, आपले वडील शहाजीराजे आदिलशहाच्या कैदेत आहेत तर पुरंदरच्या लढाईत आपले खरे सहकारी बाजी पासलकर हे धारातीर्थी पडले. फर्रादखानाने बंगळुरास वेढा दिलेला होता. या विचाराने शिवरायांना विजय मिळाल्याचा आनंद घेता आला नाही. इतक्यात त्यांना कळाले की, त्यांचे मोठे भाऊ संभाजीराजांनी बंगळुरास फर्रादखानाला भरपूर मारून हाकलून लावले होते. या बातमीने शिवरायांची थोडीशी काळजी दूर झाली होती.

आता शिवरायांनी मुद्दाम दिल्लीच्या बादशहाकडे आपला एक वकील पत्र देऊन पाठवला होता. त्यांनी या गोष्टीचा फायदा करून घेण्याचे ठरविले. आपण बादशहाला पत्र पाठविल्याची माहिती आदिलशहाला कळेल अशी त्यांनी व्यवस्था केली आणि बरोबर तसेच झाले. त्या बातमीने आदिलशहा घाबरला, कारण त्याला वाटले की, आता शिवराय दिल्लीच्या बादशहाला सामील होऊन आपल्यावर मोगलांची टोळधाड आणणारच. जर ते दोघे एकत्र आले तर आपली आदिलशाही जागेवर राहील का? हा विचार करून तो खूपच घाबरला. आपला डाव आपल्यावरच उलटतो आहे की काय? असे त्याला वाटले.

फत्तेखान शिवरायांकडून मार खाऊन परत आला. तसेच फर्रादखान बंगळूरहून हात हलवत परतला. मुस्तफाखान जिंजीजवळ मेला आणि आता या शिवरायांनी बादशहाशी जवळीक करून आमचेच दात आमच्याच घशात घातले तर, असा विचार करून आदिलशहा खूपच गोंधळला. आता आपल्याकडे शहाजीराजांना सोडून देण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे त्याच्या लक्षात आले.

आदिलशहाने असे दाखविले की, आपण शहाजीराजांना स्वखुशीने सोडून देत आहोत. त्यामुळे शहाजीराजांची तेथून सुटका झाली व त्यांना आदिलशहापुढे हजर करण्यात आले. तेव्हा आदिलशहा शहाजीराजांना म्हणाला, “राजे, जे काही घडले ते फक्त गैरसमजुतीमुळे घडले. आता आमच्या मनात तुमच्या विषयी काहीच नाही. आम्ही आपल्या मैत्रीची कदर करतो आहोत. आमचे व तुमचे संबंध आता पूर्वीसारखेच राहतील. तुम्ही फक्त आमच्यासाठी एक गोष्ट करा की, जसे आम्ही तुम्हाला सोडले तसेच तुम्ही आमच्यावरील तुमचे प्रेम दाखवण्यासाठी शिवरायांना सांगून त्यांच्या ताब्यातील कोंढाणा गड आणि संभाजीच्या ताब्यातील बंगळूर आमच्या ताब्यात द्या आणि तुम्ही पूर्वीसारखेच आमच्या सेवेत राहा.”

आदिलशहाची लहर कधी फिरेल याचा विश्वास नाही, असा विचार करून शहाजीराजांनी त्याचे म्हणणे मान्य केले तेव्हा आदिलशहाला खूपच आनंद झाला. त्याने हत्ती, घोडे व मानाचा पोशाख देऊन शहाजीराजांचा मोठा मान-सन्मान केला.

राजगडावर हे वृत्त समजताच माँसाहेबांना आणि शिवरायांना खूप आनंद झाला. आपले वडील सुटले, स्वराज्य बचावले, पराक्रमाचे सार्थक झाले. परंतु एक शल्य मात्र शिवरायांना होते की, कोंढण्यासारखा गड आदिलशहाला परत करावा लागणार होता कारण शहाजीराजांचे तसे पत्र आले होते. शिवरायांनी विचार केला की, ठीक आहे, आम्ही कोंढाणा देऊ; परंतु थोडयाच दिवसांत तो परत जिंकून घेऊ, असा विचार करून शिवरायांनी कोंढाणा आदिलशहाला परत केला परंतु तो परत जिंकण्याचा निर्णय घेऊनच.

Leave a Comment

x