शिवराय व मावळयांचा विजय | Shivray va mavlyancha vijay Marathi Katha

शिवराय व मावळयांचा विजय | Shivray va mavlyancha vijay Marathi Katha

शहाजीराजे आदिलशहाच्या हुकुमानुसार कैदेत होते त्यामुळे आदिलशहा खूपच आनंदी होता. बंगळूरहून फर्रादखान शहाजीराजांच्या कुटुंबियांना पकडून येथे आणेल व फत्तेखान तिकडे शिवरायांचा पराभव करेल असा विचार करून आदिलशहा मनातल्या मनातच खूप खुश होत होता.

फत्तेखानाला देखील असेच वाटत होते की, आपल्या सैन्यामुळे शिवाजी भयभीत होईल व बाळाजी हैबतराव शिरवळचे ठाणे आणि सुभानमंगळ गड त्यांच्याकडून हिसकावून घेईल तेव्हा ते मावळे पळून जातील. मग एकटे शिवाजी काय करणार? पुरंदर आपल्याला आयताच मिळेल.

इकडे शिवराय लढाईच्या दृष्टीने पुरंदरचा बंदोबस्त करण्यात गुंतले होते. शिवरायांनी मावळयांना सांगितले, “जर फत्तेखान येथे येण्याआधीच आपण त्याच्यावर हल्ला केला तर.?”

राजांचा हा विचार सर्वांना पटला आणि फत्तेखानावरील हल्ल्याची योजना तयार झाली. सर्व मावळयांनी ठरवविल्याप्रमाणे मध्यरात्रीच फत्तेखानाच्या छावणीवर धाड टाकली. फत्तेखानाच्या सैनिकांना कोणी हल्ला केला हे कळण्याच्या आतच मावळयांनी शेकडो सैनिकांच्या माना कापल्या. सर्व ठिकाणी हलकल्लोळ झाला. समोरासमोर लढणे आता कठीण आहे हे लक्षात येताच सर्व मावळे पुरंदरकडे निघून गेले.

फत्तेखानाचे सैनिक अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे खूपच घाबरले. कधी अचानक येऊन मावळे आपल्या माना कापतील याचा त्यांना भरोसा राहिला नाही. फत्तेखान देखील मनातून खूपच घाबरला परंतु वरवर तो उसने अवसान आणत शिवरायांवर चालून जाण्याच्या कल्पना करू लागला.

फत्तेखान अतिशय घाबरलेल्या अवस्थेत असतानाच शिरवळवरून कसा-बसा आपला जीव वाचवून पळालेले फाजलशाह आणि अशरफशाह त्याच्यासमोर येऊन उभे राहिले तेव्हा त्याच्या लक्षात आले की काल रात्री आपली जी अवस्था झाली तीच यांची देखील झाली असणार! तरी देखील त्याने त्यांना विचारले, ‘काय झाले? तुमची तोंड अशी काळी का पडली आहेत!”

तेव्हा त्याला समजले की, बाळाजी हैबतराव मारला गेला, सुभानमंगळ किल्ला आणि ठाणे शिवरायांनी परत जिंकून घेतले. हे ऐकून तर तो पूर्णपणे खचून गेला. परंतु कसेबसे उसने अवसान आणत तो म्हणाला, “त्या एवढयाशा पारोंनी तुम्हाला धूळ घातली?”

फत्तेखान आता खूपच संतापला व त्या संतापातच त्याने आपल्या फौजेला पुरंदराकडे कूच करण्यासाठी सज्ज होण्यास सांगितले. ते सर्वजण पुरंदरकडे निघाले तेव्हा पुरंदरावर अतिशय उत्साहाचे वातावरण होते.

फत्तेखानाची फौज गडाकडे येताना दिसताच इशारा दिला गेला व सगळीकडे धावपळ, लगबग, गडबड सुरू झाली आणि प्रत्येक मावळा आपली हत्यारे घेऊन नेमून दिलेल्या जागी सज्ज झाला. तोफांची तोंड शत्रूकडे वळली. खानाला सर्वत्र शांतता दिसली म्हणून त्याने आपल्या फौजेला गडावर हमला करण्यास सांगितले.

फत्तेखानाची एवढी मोठी फौज घोडयावर बसून गड कसा काय चढणार? आणि पायवाट तर चिंचोळी होती. त्यासाठी ते सर्वजण घोडयावरून उतरून गड चढू लागले. फत्तेखान देखील स्वतः गड चढू लागला. या फौजेला अशी चढणीची सवय नसल्यामुळे थोडे वर जाताच त्यांची दमछाक झाली.

गडावर मात्र सर्व तयारी होती म्हणून ती फौज माराच्या टप्प्यात येताच राजांनी इशारा केला व प्रचंड शिळा, दगड खानाच्या फौजेवर आदळू लागले. त्यामुळे अनेक सैनिकांचा फडशा पडला. मेलेले सैनिक गडगडत खाली जाऊ लागले. खानाची सर्व फौज लाहयांसारखी होरपळून निघाली. सर्व डोंगर रक्ताने लाल झाला. आता खानाच्या फौजेचे धैर्य खचायला लागले.

कावजी मल्हारने मिनादखानला गाठले तर गोदाजी जगताप मुसेखानावर चालून गेला. गोदाजीची तलवार मुसेखानाच्या काळजात आरपार घुसली. खानाच्या फौजेने शस्त्रे तेथेच टाकून ते जीव वाचविण्यासाठी तेथून पळत सुटले. मावळे मात्र त्यांचा पाठलाग करीत होते. बाजी पासलकर देखील शत्रूच्या मागे धावत होते. परंतु ते एकटे आहेत असे बघून शत्रूने त्यांना एकटे गाठून ठार केले. शिवरायांना आपला जिवलग सखा गेल्याचे बघून खूपच गहिवरून आले.

फत्तेखानाची उरलेली फौज जीव वाचवण्यासाठी पळून गेली. शिवरायांच्या मावळयांनी मात्र पराक्रम करून बलाढय अशा शत्रूचा पराभव केला होता. नीलकंठकाकांचे शिवरायांनी आभार मानले व त्यांचा भेटी देऊन सत्कार केला. गडावर संरक्षणासाठी अधिकारी नेमले आणि पुरेशी अशी शिबंदी ठेवून शिवराय आपल्या मावळयांसह राजगडावर परत आले.

Leave a Comment

x